औरंगाबाद: गुरुवारी सोशल मीडियावर वेरूळ भागात ‘वाघा’चे दर्शन झाल्याचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला आणि जागतिक व्याघ्रदिनी वन विभाग खडबडून जागा झाला. वन विभागाच्या पथकाने धाव घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला; पण तो सापडला नाही. मात्र हा वाघ नसून बिबट्याच असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे खुलताबाद तसेच वेरुळ लेणी परिसरात घबराट पसरली आहे.
वेरुळ लेणी परिसरात रस्त्याच्या लागून असलेल्या डोंगरावर हा बिबट्या एका पर्यटकाला निदर्शनास आला. त्याने त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हारयल केला. यामुळे खुलताबाद तसेच औरंगाबाद विभागातील वनाधिकारी तत्काळ वेरुळ लेणीकडे धावले. वन विभागाच्या पथकाने अगदी सकाळपासून त्याचा शोेध घेतला. वेरूळ लेणी परिसरातील गेस्ट हाऊसकडे बिबट्या गेल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. पथकाने वेरूळ परिसर व लेणी डोंगर पायाखालून घातला. परंतु त्याचे वाघ किंवा बिबट्याचे पदमाग सापडले नाहीत. परंतु वेरूळ येथे मंगळवारी या बिबट्याने दोन बकऱ्या मारल्याचे उघड झाले आहे. या बिबट्याचे वनक्षेत्रात वास्तव्य असून, अधूनमधून त्याचे दर्शन होत असल्याचेही स्थानिक ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
स्थानिक नागरिकांनी केला व्हायरल...
वेरूळ येथील एका नागरिकाने प्रवासाच्या वेळी गुरुवारी सकाळी ७ वाजता बिबट्याचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने वन विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले.
या पथकाने घेतला शोध...
वनपाल नंदू तगरे, कैलास जाधव, वनरक्षक सोमनाथ बरडे, प्रशांत निकाळजे, मयूर चाैधरी तसेच वनमजूर आणि पुरातत्वचे कर्मचारीदेखील शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
मंगळवारी रात्री दोन बकऱ्या मारल्या...
खुलताबाद : गुरुवारी व्हिडिओ व्हायरल होताच शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधून मंगळवारी बिबट्याने दोन बकऱ्या मारल्याचे सांगितले. वेरूळ लेणी जवळील खुलताबाद-वेरूळ रोडवरील घाटाखाली योगेश रिट्टे यांची शेती असून मंगळवारी रात्री शेतातील घराशेजारी बांधलेल्या सोळा बकऱ्यांपैकी दोन बकऱ्यांचा फडशा पाडला तर एक बकरी बिबट्याने जखमी केली. बकऱ्यांचा आवाज ऐकून योगेश रिठ्ठे झोपेतून जागे झाले. त्यांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. मात्र बिबट्या पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. वेरूळ, खुलताबाद परिसरातील बिबट्याच्या वावरामुळे पशुपालकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तो बिबट्याच...
वेरूळ घाटात आढळलेला तो बिबट्याच असून, गवतामुळे त्याचे पदमाग आढळून आलेले नाही. परंतु डोंगरात कुठे तरी तो निघून गेला आहे. वन विभागाच्या पथकाने किमान १२ ते १५ किलोमीटर परिसर लेणीसह पिंजून काढला. परंतु बिबट्याचे दर्शन झाले नाही. तो वाघ नसल्याचा दुजोरा देत या भागात फक्त बिबटेच आहेत. स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी, एकट्याने जंगलात जाऊ नये, हातात किमान काठी असावी, असे काही खबरदारीचे उपाय सुचविले आहेत. - अरुण पाटील, उपवन संरक्षक, औरंगाबाद विभाग
जंगलात वास्तव्यास ...
खुलताबाद गेस्ट हाऊस, म्हैसमाळ डोगर, वेरूळ लेणी डोंगर परिसरात एक बिबट्याचा गेल्या दोन वर्षापासून वावर असून तो हाच बिबट्या आहे. बिबट्याचे वास्तव्य जंगलात असून गावात अथवा रस्त्यावर येत नाही त्यामुळे त्याच्याशी छेड काढली तर सैरभैर होऊन कुठेही जाईल. मंगळवारी मारलेल्या बकऱ्याची माहिती गुरुवारी सांगण्यात आली आहे. - वनपरिक्षेत्र अधिकारी आण्णासाहेब पेहरकर, खुलताबाद
फोटो कॅप्शन.. बिबट्याचा शोध घेणारे वन विभागाचे पथक. दुसऱ्या छायाचित्रात व्हिडिओत दर्शन झालेला प्राणी.