औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजे ३ टक्के म्हणजेच २७ ते ३० हजार ग्रामीण मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायास मत दिल्याने निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला पाहण्यास मिळाला. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक मैदानात होते. नोटा या पर्यायावर मते दिल्यामुळे अनेक ठिकाणी १० ते २० मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले, तर १८ ठिकाणी समान मते मिळालेल्या ठिकाणी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करावा लागला.
१८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तालुकानिहाय मतमोजणीची जबाबदारी असल्यामुळे तहसीलदार पातळीवरून सर्व माहिती संकलित करून अहवाल करण्याचे काम बुधवारी देखील सुरू होते. ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ८९ सदस्य निवडून देण्यासाठी मतदान झाले. ३२ ग्रामपंचायत बिनविरोध होऊन ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५ लाख ५१ हजार ८२२ महिला तर ६ लाख ४ हजार ८०४ पुरूष अशा एकूण ११ लाख ५६ हजार ६२६ पैकी ९ लाख ३३ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१८ प्रभागांसाठी काढावी लागली चिठ्ठीजिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीतील १८ प्रभागात उभ्या असलेल्या ३६ उमेदवारांना समान मते मिळाली. या ठिकाणी चिठ्ठी काढून उमेदवाराला विजयी घोषित करावे लागले. चुरशीची लढत झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ३, पैठण ३, वैजापूर ४, सिल्लोड १, गंगापूर १, फुलंब्री १ तर कन्नडमधील ५ ग्रामपंचायतीतील उमेदवारांना भाग्याने साथ दिल्याने त्यांचा विजय झाला.
आयोगाची माहिती अशीराज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त जे. टी. मोरे यांनी सांगितले, पूर्ण जिल्ह्यातून मतदान, नोटाची माहिती संकलन सुरू आहे. माहिती येताच ती आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.
निवडणूक नियम काय सांगतोनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा नोटा पर्यायाला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी नोटानंतर सर्वाधिक मतं मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात नोटामुळे निवडणूक नियम वापरण्याची गरज कुठे पडले नाही.
नोटाला मिळालेली एकूण मतेजिल्ह्यात सरासरी झालेल्या मतदानाच्या तुलनेत ३ टक्के मतदान नोटा या पर्यायाला मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २७ ते ३० हजारांच्या दरम्यान हे प्रमाण असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे मत आहे. तालुकानिहाय माहिती संकलन सुरू असून त्यानंतर अंतिम आकडा समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले.