वाळूज महानगर : उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. आतापर्यंत ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
रांजणगाव शेणपुंजी गावातील शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवर अतिक्रमणे करुन अनेक गरीब कामगार व नागरिकांनी पक्की घरे बांधली आहे. येथील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील गायरान व महार हाडोळा जमिनीवर जवळपास ४ हजार घरे बांधण्यात आली असल्याच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी शेख सिंकदर यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर तीन महिन्यांपूर्वी सुनावणी होऊन अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश न्यायालयाने ग्रामपंचायतीला दिले.
लोकसभा निवडणुकीमुळे प्रक्रिया बंद होती. ती पुन्हा सुरु करण्यात आली असून, संबधित अतिक्रमणधारकांना १५ दिवसांत स्वत:हून अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना नोटिसीद्वारे देण्यात आल्या आहेत. मुदतीत अतिक्रमणे न हटविणाºया अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जाणार आहे.
संबधितांकडून अतिक्रमण काढण्यासाठी झालेला खर्चही ग्रामपंचायत वसुल करणार असल्याचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्याचे ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी सांगितले.