औरंगाबाद : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिक्षापत्र सादर केलेले आहे. यातील बोगस प्रतिज्ञापत्रावरून सोयगाव तालुक्यातील करदाते, नोकरदार अशा ४०१ शेतकऱ्यांना महसूल विभागाने सोमवार दि. ५ रेाजी नोटिसा बजावल्या. त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
केंद्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर तीन महिन्याला दोन हजार रूपये निधी दिला जातो. या संदर्भात झालेल्या सर्व्हेक्षणात असे सिद्ध झाले आहे की, खोट्या प्रतिज्ञा पत्राद्वारे या योजनेचा लाभ तब्बल ४०१ अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. या सर्वांना दि. १२ ते १६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे.
भारतीय दंड विधान संहितेचे कलम १७७, १९९, २०० नुसार हा दंडनीय गुन्हा असून अपात्र शेतकऱ्यांनी उचल केलेला निधी शासनाला परत न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत कारवाई करून तो वसूल केला जाईल, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे.