नांदेड : बदल्यांचे वेळापत्रक निश्चित असताना अन्य कालावधीत बदल्यांच्या संचिका सादर का केल्या जात आहेत, याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, उपशिक्षणाधिकारी एम़डी़ पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील ४ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्यांचा उद्योग वर्षभर सुरू आहे़ ही बाब पुढे आल्यानंतर काळे यांनी सदर प्रकरणात लक्ष घातले़ हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ सुमंत भांगे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करूनही काही आदेश बजावण्यात आले आहेत़ एकाच आऊटवर्ड क्रमांकाद्वारे बदलीचे आदेश देण्यात आले होते़ हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे़ वर्षभरात गटशिक्षणाधिकाऱ्यांना नियुक्तीसाठी दिलेल्या आदेशांच्या सर्व प्रति मागविण्यात आल्या आहेत़ आतापर्यंत ७ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी आलेल्या प्रकरणाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्याकडे पाठविली आहे़ दरम्यान, आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांच्या बदल्याबाबतचे वेळापत्रक २९ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार निश्चित केले आहे़ १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे़असे असताना शासन निर्णयाबाहेर जावून अनेक संचिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीसाठी पाठविल्या जात आहेत़ याबाबत आपणास का जबाबदार धरू नये, तसेच कोणत्या कारणामुळे शासन निर्णयाचे पालन न करता संचिका सादर कराव्या लागत आहेत याबाबत शिक्षणाधिकारी मडावी, उपशिक्षणाधिकारी पाटील, शिक्षण विभागातील पी़ एम़ थोरवटे, के़पी़ श्रीरामे, ए़ बी़ शिरसेठवार आणि डी़ के़ भुरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ सात दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे़या प्रकरणानंतर जि़प़ शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे़ (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: September 07, 2014 12:21 AM