औरंगाबाद : घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुरेश हरबडे, मार्डचे अध्यक्ष आबासाहेब तिडके, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. अच्युत लघुळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
घाटीत वाढलेला गुंड, मवाल्यांचा वावर, निवासस्थानात अनाधिकृतपणे राहणारे रहिवासी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मार्ड संघटनेने केली. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना केली. नवीन संरक्षक भिंत बांधण्यासाठी घाटीने ३ वर्षांपुर्वी दिलेला प्रस्ताव रेंगाळला आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच घाटीतील मेस्को आणि एमएसएफ या दोन सुरक्षा यंत्रणा असून सुरक्षा यंत्रणेचे एक कोटी रूपयांचे बिल थकले आहे, हा प्रश्नही पालक मंत्र्यांपुढे मांडण्यात आला.
शुक्रवारी होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत सुरक्षेसाठी घाटीला निधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.