औरंगाबाद : भूविकास बँकेच्या मालकीची क्रांती चाैकातील इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील भाडेकरू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह २२ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी नुकत्याच पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देणाऱ्या भूविकास बँकेचे कर्ज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी फेडू शकले नव्हते. एवढेच नव्हे तर शासनाने कर्ज हमी देण्यास नकार दिल्याने नाबार्डने २५ वर्षांपूर्वी भूविकास बँकेचे कर्ज देणे बंद केले होते. तेव्हापासून बँकेकडून केवळ वसुलीची कामे सुरू होती. मात्र, वसुलीत प्रगती होत नसल्याचे लक्षात घेऊन शासनाने ही बँक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. बँकेची औरंगाबादेतील क्रांती चौक येथील मोक्याची इमारत सहकार विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यानंतर बँकेवर अवसायकांची नेमणूक करण्यात आली.
शासन निर्देशानुसार बँकेच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा लिलाव करून, विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे काम अवसायकांनी केले. क्रांती चौकातील बँकेच्या तीन मजली इमारतीत देवगिरी नागरी सहकारी बँक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान यांच्यासह २२ गाळ्यांत भाडेकरू आहेत. दानवे यांच्या प्रतिष्ठानने भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका मजल्यावर अभ्यासिका आणि शिवसेनेचे संपर्क कार्यालय थाटण्यात आले आहे. आता ही इमारत सहकार विभागाकडे हस्तांतरित होत असल्याने भूविकास बँकेसोबत भाडेकरूंनी केलेला करार संपुष्टात येणार आहे. दानवे यांच्या प्रतिष्ठानला इमारतीचा एक मजला भाडेतत्त्वावर देताना भूविकास बँकेने ११ महिन्यांचा करार केला होता. यासाठी त्यांना दरमहा ७२ हजार रुपये भाडे आणि ७ लाख रुपये डिपाॅझिट घेण्यात आले आहे. त्यांचा भाडेकरार २५ मे रोजी समाप्त होत आहे.देवगिरी नागरी सहकारी बँकेला आणि गाळेधारकांना नाममात्र भाडे आहे. या सर्व गाळेधारकांना भूविकास बँकेच्या अवसायकांनी नोटिसा बजावल्या आहेत. भूविकास बँकेसोबतच्या करारानुसार मातृभूमी प्रतिष्ठानला त्यांच्या कार्यालयाची जागा सोडावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या गाळेधारकांचा अनेक वर्षांपासून भूविकास बँकेसोबत भाडेकरारावरून वाद सुरू आहे.
भूविकास बँकेची इमारत सहकार विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामुळे या इमारतीमधील सर्व भाडेकरू, गाळेधारकांना आम्ही नोटिसा बजावून गाळे रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या प्रतिष्ठानसोबत असलेला करार २५ मे रोजी समाप्त होत आहे. यामुळे त्यांनाही आधीच नोटीस देऊन करार समाप्तीबाबत कळविले आहे.- अनिलकुमार दाबशेडे, अवसायक, जिल्हा भूविकास बँक
सरकारने गाळेधारकांना ती इमारत विकावीमी भूविकास बँकेला दरमहा ७२ हजार रुपये भाडे देतो. सर्वाधिक भाडे देणारे आपण एकमेव आहोत. शासनाकडून अन्य ठिकाणची जागा विक्री केली तशीच या इमारतीचीही केली जाणार असेल, तर ही इमारत खरेदी करण्याची सर्व गाळेधारकांची तयारी आहे. शासन जो निर्णय घेईल, तो भाडेकरू म्हणून आम्हाला मान्य असेल.- आ. अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते.