औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्प पैठण येथून औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण शहरासाठी उपसा केलेल्या पाण्याची फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत थकबाकी असून, ती १८ मार्चपर्यंत न भरल्यास १९ मार्चपासून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद पालिकेकडे ८ कोटी ५८ लाख ६४ हजार, जालना नगरपालिकेकडे १ कोटी ७१ लाख ४० हजार, तर पैठण नगरपालिकेकडे ७३ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. जायकवाडी पाटबंधारे कार्यालयाकडून थकीत पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार पत्रव्यवहार करून तसेच समक्ष भेटूनसुद्धा अद्यापपर्यंत थकीत रक्कम आपण जलसंपदा विभागाकडे भरणा केली नसल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण नगर परिषदेला कळविले आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून तसेच शासनाकडून वारंवार पाठपुरावा व विचारणा होत असल्याकारणाने सदरील थकबाकी तत्काळ भरणा करण्यात यावी.अन्यथा बिगर सिंचन योजनेचा जायकवाडी जलाशयातून सुरू असलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ९७ (१) व कलम ४५ (ज) अन्वये टप्प्याटप्प्याने बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
औरंगाबाद मनपा, जालना नगरपालिका पैठण नगर परिषदेने पाणीपट्टी न भरल्यामुळे होणारा पाणीपुरवठा नियमानुसार बंद केल्यास शहरातील नागरिकांना होणार्या गैरसोयीला संबंधित मनपा, नगर परिषद जबाबदार राहील, याची नोंद घेऊन तातडीने पाणीपट्टीची थकीत रक्कम अदा करावी.
थकबाकी भरा अन्यथा पाणी उपसा बंद १९ मार्च रोजी सकाळी ११ वा. दोन तास पाणी उपसा बंद करण्यात येईल, २० मार्च रोजी ११ वा. चार तास पाणी उपसा बंद करण्यात येईल. २१ मार्च रोजी ११ वा. सहा तास पाणी उपसा बंद करण्यात येईल, २२ मार्च रोजी ११ वा. आठ तास पाणी उपसा बंद करण्यात येईल. २३ मार्च रोजी पूर्णपणे पाणी उपसा बंद करण्यात येईल, असे जायकवाडी प्रकल्प पाटबंधारे विभागाने नोटिशीमध्ये म्हटले आहे.