कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ शेख जावेद याने १७ सप्टेंबर रोजी शिवाजीनगरात दुचाकीस्वार महिला व सहायक उपनिरीक्षक सीताराम केदारे यांच्या अंगावर जीप घालून त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटल्यानंतरही आरोपी टिप्या पोलिसांच्या हाती लागला नाही. टिप्या नेहमी सशस्त्र असतो. यामुळे पुंडलिकनगर, गारखेडा परिसरात त्याची दहशत आहे.
तो शहरातून पळून गेल्याचे पोलिसांना समजले. तो नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. गुन्हेशाखेचे पथक अंदरसूल येथे गेले. मात्र तेथेही पोलिसांना चकमा देऊन तो पसार झाला.
--------------------
कोण हा टिप्या...
--कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ जावेद शेख याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहर पोलिसांनी त्याला एमपीडीएखाली स्थानबद्ध केले होते. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात तो जेलमधून बाहेर आला. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी शहरातील नामचिन गुंड हजर होते.
-- ऑक्टोबर २०२० मध्ये पुंडलिकनगर रोडवरील उभ्या कारच्या टपावर चढून मद्यधुंद मैत्रिणीसह तो डीजेच्या तालावर नाचला होता. ही व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यास अटक केली.
--- टिप्याला अटक केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा चांगलाच पाहुणचार केला होता. तेव्हापासून तो गायब झाला होता.
-- पाच-सहा महिन्यांपूर्वी टिप्याचे एका गुंडासोबत भांडण झाले होते. तेव्हा त्याच्यावर चाकूहल्ला झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याने स्वत: पडल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे घटनेची एमएलसी नोंद झाली नव्हती.