सिल्लोड : जळगावकडून सिल्लोडकडे ३ गावठी कट्टे आणि ११ जिवंत काडतूस विक्रीसाठी घेऊन जाणारा कुख्यात दरोडेखोर संतोष अंकुश सावंत ( रा. सुरेशनगर नेवासा जिल्हा अहमदनगर ) पोलिसांच्या सापळ्यात अडकला. डोंगरगाव फाट्यावर झालेली ही कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान केली.
सिल्लोड स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी खबऱ्याने संतोष अंकुश सावंत हा कुख्यात दरोडेखोर गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी जळगावहून सिल्लोडकडे येत असल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी डोंगरगावफाट्याजवळ सापळा रचला. दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या संतोष अंकुश सावंत याला अडवले. त्याच्या दुचाकीच्या ( एम.एच. १२ जे.जे. ४५६७ ) झडतीत डिक्कीमधून ३ गावठी कट्टे आणि ११ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली. सावंत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर लातूर येथे हत्यासहित दरोड्याची गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक फौजदार सुधाकर दौड, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे , पोलीस नाईक विलास सोनवणे गुन्हे शाखेचे हवालदार गणेश मुळे, विठ्ठल राख,नामदेव क्षीरसाठ, संजय देवरे,धीरज जाधव,दीपेश नागझरे, राहुल पगारे, रामेश्वर धापसे, बाबासाहेब नवले, न्यानेश्वर मेटे, उमेश बकले,योगेश तरमाळे यांनी केली.