लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंदाज समितीने जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध भागांत विकासकामांची पाहणी केली. त्यात काही ठिकाणच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा पंचनामा केल्यानंतर स्थानिक विभागप्रमुखांना कारवाई करण्याच्या अथवा शिफारशीच्या सूचना दिल्या. मात्र त्यात काहींचे ‘फिल गुड’ झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाज समितीने हिंगोली जिल्ह्यात विविध कामांची पाहणी केली. अनेक आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी या समितीकडे गेल्या होत्या. काहींनी तर समितीच्या सदस्यांचे आगमन झाल्यानंतर येथे तक्रारींचा पाढा वाचणे सुरू केले होते. याची दखल घेत काही ठिकाणच्या कामांना या समितीने भेट दिली. कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातही डॉक्टर राहत नसल्याच्या गेल्या अनेक दिवसांच्या असलेल्या तक्रारींना समितीच्या आगमनामुळे खऱ्या अर्थाने वाचा फुटली. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर हे भोकर येथून याच कारणांनी बदलीवर कळमनुरी येथे आले होते. कामावर हजर न राहणे, आर्थिक अनियमितता, कर्मचाऱ्यांचे वेतन न करणे या गंभीर बाबींचा ठपका ठेवल्यानंतरही लोणीकर यांना अधीक्षक म्हणूनच का पाठविले? हा गंभीर प्रश्न आहे. समितीने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. रॉकेल आता सामान्यांना कुठे मिळतच नाही. नियतनही दिवसेंदिवस घटत चालले आहे. रॉकेल जाते कुठे हे सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाय रॉकेलचे शासकीय दरही वाढू लागले आहेत. त्यातही वितरकच कमी रॉकेल देत असतील तर ग्रामीण विक्रेते त्यापासून योग्य तो बोध घेणारच, यात शंका नाही.रस्त्यांची कामे पूर्वीही व्हायची, आताही होतात. मात्र आता नवनवी कारणे सांगून रस्त्याचे काम दर्जेदार केले होते. मात्र आता त्यात असे झाले, हे सांगणे सोपे झाले आहे. अभियंता मंडळी उंटावरून शेळ्या हाकते. तुकडे पाडून कामे करण्याच्या प्रकारात एमबी लिहिण्यापेक्षा त्यावर केवळ स्वाक्षऱ्या करण्यातच अभियंत्यांचे हात दुखतात, मग कामाची तपासणी कधी करायची? दर्जा कोणी तपासायचा? हे यक्षप्रश्न सुटत नाहीत. त्यातच खालपासून वरपर्यंतची साखळी एकमेकांना सांभाळायला तयारच आहे. ही बोंब बंधाऱ्यांच्याही कामाची. या दौऱ्यात समितीने अधिकाऱ्यांना जोरात जाब विचारले तरीही काही ठिकाणी नरमाईची भूमिका घेतली. ज्यांना समितीचा ‘अंदाज’ आला होता, त्यांनी मात्र आपले इप्सित साधून घेतले. यात काहींना ‘रोकडा’ फटका बसल्याचेही आता चर्चेत येत आहे. काहींनी तर यासाठी भागीदारही शोधल्याचे चर्चिले जात आहे. मात्र समितीने खरोखर काय कारवाई केली, हे लवकरच समोर येणार आहे.
आता समितीच्या कारवाईचा धसका
By admin | Published: July 08, 2017 11:36 PM