औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पीएच.डी.प्राप्त केलेल्या अध्यापकांना तीन वर्षांनंतर संशोधक मार्गदर्शक (गाईड) होता येईल, ही अट व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानंतर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वच पीएच.डी.धारक अध्यापकांना संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून संशोधन पूर्व परीक्षा (पेट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नीत महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांना पीएच.डी. प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षांची अट पूर्ण केल्यानंतर त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली जात होती. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत गाईडची संख्या अपुरी असल्यामुळे संशोधनास पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, या मुद्यावर चर्चा झाली. त्यामुळे पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर तीन वर्षे पूर्ण करण्याची अट त्या बैठकीत रद्द करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार विद्यापीठाने परिपत्रक जारी केले असून पीएच.डी. प्राप्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक संशोधक मार्गदर्शकासाठी अर्ज करू शकतील, असे कळविण्यात आले आहे.
पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी विद्यापीठाकडे रितसर नोंदणी केलेले होती, अशा विद्यार्थ्यांच्या मुलाखती विद्याशाखानिहाय संशोधन अधिमान्यता समितीने घेतल्या. त्यामध्ये गुणवत्तेनुसार निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना गाईड मिळत नव्हते. गाईडची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत होते. आता विद्यापीठाच्या या निर्णयामुळे गाईड उपलब्ध होतील, अशी संशोधक विद्यार्थ्यांची आशा पल्लवित झाली आहे.