मराठवाड्यात काँग्रेसची धुरा आता अमित देशमुख यांच्याकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 08:11 PM2024-08-13T20:11:11+5:302024-08-13T20:13:12+5:30
मराठवाड्यात २५ काय त्याहून अधिक जागा सोडवून घेणार: नाना पटोले
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात काँग्रेसची धुरा आता स्व. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र व माजी मंत्री अमित देशमुख सांभाळतील, असे सोमवारी छत्रपती संभाजीनगर- जालना जिल्ह्यातील विधानसभावार आढावा बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. हात जोडून अमित देशमुख यांनी ही नवी जवाबबदारी स्वीकारली.
याचवेळी अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील ४६ पैकी २५ जागा सोडवून घ्या. आम्ही निवडून आणून दाखवू. असा विश्वास दाखवला होता. त्यावर नाना पटोले म्हणाले, २५ काय त्याहून अधिक जागा सोडवून घेऊ.(टाळ्या).
दिल्लीहून आलेल्या यादीत मराठवाड्याच्या नेतृत्त्वाचे नाव नसते. ते असावे, असे यावेळी जालन्याचे खासदार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक करताना निदर्शनास आणून दिले होते. हा धागा पकडून पटोले यांनी, पूर्वी मराठवाड्याच्या नेतृत्त्वाचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर असायचे. ते नेतृत्व मराठवाड्याला वाळवंट करून दुसऱ्या पक्षात गेले असा टोला नाव न घेता अशोक चव्हाण यांना मारला.