जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललाय. बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची बेड मिळविण्यासाठी एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलकडे होणारी धावपळ. व्हेंटिलेटरअभावी दवाखान्याबाहेरच दगावत असलेले रुग्ण, हे विदारक चित्र मनाचा थरकाप उडविणारे आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची विनाकारण होणारी धावपळ व त्यातून येणारी निराशा थांबविण्यासाठी विद्यापीठाने स्वत:हून आपल्या वेबसाईटवरून कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलनिहाय बेड उपलब्धतेबद्दलची माहिती अपडेट केली जाणार आहे. एवढेच नाही, तर संबंधित हॉस्पिटल कुठे आहे. त्या हॉस्पिटलला दूरध्वनी क्रमांक, तेथील डॉक्टरांचे मोबाइल क्रमांक, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची दिशा आदी सर्व अपडेट माहिती वेबसाईटवर दिली जाणार आहे.
यासाठी विद्यापीठ प्रशासनाने याबाबत महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या एका पत्राद्वारे अनुमती मागितली आहे. महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये रिक्त बेडच्या माहितीसाठी ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ (एमएच,एमएच) हे ॲप विकसित केले आहे. त्या ॲपचा डाटा विद्यापीठाच्या वेबसाईटला लिंक करून ही माहिती नागरिकांच्या हितार्थ विद्यापीठाच्या वेबसाईटवरून सतत अपडेट केली जाणार आहे.
चौकट.....
वेबसाईटला सर्वाधिक ‘हिट’
विद्यापीठाचा ‘युनिक’ हा माहिती व तंत्र विभाग आणि ‘बजाज इन्क्यूबिशन सेंटर’ विभागामार्फत सदरील उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेची अनुमती मिळाल्यास तत्काळ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तथापि, महापालिकेत याबाबत ‘वॉर रुम’ तसेच ‘एमएच, एमएच’ हे ॲप कार्यान्वित असताना याची गरज का वाटली, याबद्दल ‘युनिक’ तर्फे सांगण्यात आले की, विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दर महिन्याला ३ लाख युजर्स या वेबसाईटला भेट (हिट) देत असतात. त्यामुळे या वेबसाईटच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना हॉस्पिटल शोधण्यासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.