छत्रपती संभाजीनगर : उपवासाच्या दिवशी साबूदाना खिचडी, भगर-आमटी हे पारंपारिक पदार्थ खाल्ले जातात. मात्र, आता त्याऐवजी बिस्कीट, क्रीम रोल, कुकीज, इडली, डोसा, ढोकळा, खाखरा कोणी खाल्ले तर? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. हे खाल्ल्याने उपवास मोडेल, मग उपवास करून काय फायदा; अशी शंकाही तुमच्या मनात येणे साहजिकच आहे... अहो, जरा थांबा... हे पदार्थ राजगिरा, शिंगाड्यापासून तयार करण्यात आले आहेत.
राजगिऱ्याचे बिस्कीट, शिंगाड्याचा क्रीम रोललहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना बिस्कीट खाणे आवडते. यामुळे उपवासाची खास बिस्किटे बाजारात आली आहेत. यात राजगिऱ्यापासून बिस्किटे बनविली आहेत. तर राजगिरा, शिंगाड्याचा वापर करून क्रीम रोल तयार करण्यात आले आहेत. त्यातील क्रीमसाठी व्हाईट बटरचा वापर केला आहे.
गुजरातचा खाकरा, भगरीचा डोसा, इडलीगुजरातचा खाकरा आता देशाभरात लोकप्रिय झाला आहे. उपवासासाठी खास खाकरा बाजारात आला आहे. याशिवाय शिंगाड्याची शेव, साबुदाणा शेव व लाडू, बदाम कुकीज, अजवाईन कुकीज, कोकनट कुकीज, उपवासाची खारी, टोस्ट, खोबरा लाडू त्यातही संत्रा, आंबा, गुलाब, अननस असा स्वाद मिळत आहे. खासकरून भगरीचा डोसा, इडली, ढोकळा, पकोड्याचे पीठही मिळत आहे.
उपवासाचे १५० पेक्षा अधिक पदार्थउपवासाच्या पदार्थांत ‘नवीन काय’ असा प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांसाठी गृहउद्योगांनी तब्बल १५० पेक्षा अधिक पदार्थ बाजारात आणले आहेत. एक-एक पदार्थ बघता बघता व त्यातील घटक पदार्थांची माहिती वाचता वाचता दोन ते तीन तास सहज निघून जातात. एवढे उपवासाचे पदार्थ बघण्यास मिळत आहेत. यातील काही महाराष्ट्रात, तर काही गुजरात राज्यातील उत्पादकांनी बनविले आहेत. सर्व पदार्थ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील या किमतीत आहेत.- विश्वजित भावे, व्यापारी