छत्रपती संभाजीनगर : फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने आरोग्यदायी असा ‘सफरचंद’ही ‘राजा’पेक्षा कमी नाही. कोणी आजारी असेल तर आवर्जून रुग्णाला खाण्यासाठी सफरचंद नेले जाते. सध्या तुम्हाला बाजारात इराण व ऑस्ट्रेलियाहून आलेले महागड्या दरातील सफरचंद खावे लागते. कारण, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचे आगमन होईल. तेव्हा जनसामान्यांनाही त्याच्या अविट गोडीचा आस्वाद घेता येईल.
भारतीय सफरचंदाची नाही गोडीसध्या बाजारात इराणचे सफरचंद २०० रुपये तर ऑस्ट्रेलियाचे सफरचंद २५० रुपये किलोने विकले जात आहे. मात्र, या सफरचंदांना हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमधील सफरचंदासारखी गोडी नाही.
ऑगस्टमध्ये हिमाचल, नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरचे सफरचंद१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जाधववाडीतील कृउबाच्या आडत बाजारात हिमाचल प्रदेशातील सफरचंद विक्रीचा मुहूर्त केला जाईल. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जम्मू-काश्मीरचे सफरचंद विक्रीला येईल. तेव्हा ५० रुपये किलोपर्यंत सफरचंदाचे भाव उतरलेले असतील.
एका हातगाडीवर विकते १०० किलो सफरचंदशहागंजसह अन्य चौकात, रस्त्यावर मिळून शहरात ६०० हातगाड्यांवर सफरचंद विकले जाते. घाटी रुग्णालयाबाहेर व अन्य रुग्णालयाबाहेर सफरचंदाने भरलेल्या हातगाड्या दिसून येतात. एका हातगाडीवर दररोज १०० किलो सफरचंद विकले जाते.- शेख हबीब, विक्रेता
आरोग्यदायी सफरचंदसफरचंद हृदय आणि लिव्हरच्या समस्या दूर ठेवते. त्याशिवाय सफरचंद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण, त्यात फायबर आणि कॅलरीज कमी असतात. सफरचंदात दाहक -विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि व्हिटॅमिन-सी किंवा इतर अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात. मधुमेहाचे रुग्ण सफरचंदाचे सेवन करू शकतात. डॉक्टरही आवर्जून हे फळ खाण्यास सांगतात. पण कोणतेही फळ अतिखाणे अयोग्यच, हे सुद्धा लक्षात ठेवा, असेही डॉक्टरांनी नमूद केले.
सफरचंद कधी खावेसफरचंद शक्यतो रात्री खाऊ नाही, सकाळी किंवा दुपारी सफरचंद खावे, त्याचे शरीराला खूप फायदे होतात. रात्री सफरचंद खाल्लेतर पचन प्रक्रिया मंदे होऊ शकते. परिणामी बुद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
उत्तराखंडचा ‘नाशपती’ हातगाड्यांवरउत्तराखंडातून शहरात ‘नाशपती’ फळाची आवक झाली आहे. हे फळ नुसते सफरचंदासारखे दिसत नसले तरी त्यात सफरचंदासारखे गुणधर्म देखील आहेत. हे फळ कोलेस्ट्रॉलमुक्त आहे. चरबीमुक्त आहे. हे फळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. वजन कमी करण्यात मदत करते. रक्त परिसंचरण वाढवते आदी फायदे आहेत. बाजारात १०० ते १२० रुपये किलोने नाशपती विकत आहे.