औरंगाबाद : ' डोळ्यांपुढे काजवे चमकणे ' हा वाक्प्रचार जरी नकारात्मक अर्थाने वापरला जात असला तरी जेव्हा खरेखुरे काजवे डोळ्यांसमोर चमकत असतात, तेव्हा ते दृश्य अतिशय विहंगम दिसते. मराठवाड्यातही पूर्वी काजवे चमकायचे. पण शेतीसाठी रसायनांचा बेसुमार वापर सुरू झाला आणि कधीकाळी चमचमणारे काजवे आता जणू गायबच होऊन गेले.
मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी पर्वणीच. खंडाळा घाट, भंडारदरा, अकोले तालुका, सातारा, सांगलीचा काही भाग म्हणजे लखलखत्या काजव्यांचे नंदनवन. या दिवसांमध्ये हा प्रांत रात्रीच्या वेळी काजव्यांच्या लकाकणाऱ्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. हे अवर्णनीय दृश्य पाहण्याच्या ओढीने याकाळात हजारो पर्यटक पश्चिम महाराष्ट्र गाठतात आणि काजवा महाेत्सवाचा आनंद घेतात. काजवे हे प्रामुख्याने जास्त आर्द्रता असणाऱ्या प्रदेशात दिसतात. परंतु मराठवाड्यातही काही वर्षांपूर्वीपर्यंत काजव्यांच्या काही जाती अगदी सहज दिसायच्या. पण रासायनिक खतांची फवारणी, वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान, वाहने तसेच कारखान्यांमधून येणारे दूषित वायू या गोष्टी काजव्यांना मराठवाड्यापासून दूर घेऊन गेल्या आहेत. आता सध्या जिथे काजवे दिसतात, त्या प्रांतात तरी रसायनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करत आहे.
काजवे का चमकतात ?काजवा हा कीटक वर्गात येतो. काजव्याच्या शेपटीखाली असणाऱ्या अवयवात ल्युसिफेरीन नावाचा द्रव पदार्थ असतो. नायट्रीक ऑक्साईड, कॅल्शियम यांच्या मदतीने ल्युसिफेरीनची ऑक्सिजनसोबत प्रक्रिया होते आणि काजवे प्रकाशमान होतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी नर आणि मादी दोघेही प्रकाशमान होत असतात. काजव्यांचे अनेक प्रकार असून या प्रकारानुसार त्यांचा प्रकाशही पांढरा, पिवळा, हिरवा, केशरी अशा विविध रंगात पडत असतो.
रासायनिक खतांचा बेसुमार वापरकोरडे हवामान असतानाही काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काजवे दिसायचे. शहरी भागातही अनेकांनी काजव्यांचे चमकणे पाहिले आहे. परंतु आता मात्र ग्रामीण भागातही क्वचितच काजवे चमकताना दिसतात. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शेतीसाठी रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर. काजवे, मधमाशा यांच्यासह अनेक कीटकांवर रासायनिक खतांच्या माऱ्याचा वाईट परिणाम झाला आहे. काजव्यांचे न दिसणे म्हणजे रसायनांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढल्याचे सूचक आहे.- डॉ. सतीश पाटील, पर्यावरण अभ्यासक