छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना आरोग्याच्या सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रांचे लवकरच नामांतर होणार असून, ही केंद्रे यापुढे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ या नावाने ओळखली जातील. तथापि, नावे बदलली जातील. पण, या केंद्रांतील आरोग्य सेवा- सुविधांचे काय, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची नावे बदलून ती आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून ओळखली जात होती. मात्र, त्यानंतरही या आरोग्य केंद्रांना भौतिक सुविधा मिळाल्या नव्हत्या. या केंद्रांमध्ये जवळपास ३०० आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे संस्थात्म प्रसूती, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याणसाठी महिलांना प्रवृत्त करणे, गृहभेटी, आदी उपक्रम रखडले आहेत. या केंद्रांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. या बाबींकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाला आरोग्य केंद्रांची नावे बदलण्याचे पत्र २५ नोव्हेंबरला प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ अशा नामकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अल्प आहे. एकीकडे माता व बालमृत्यू टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती व्हावी, असा शासनाचा आग्रह आहे. मात्र, ग्रामीण भागात हे प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे सरकत नाही. यासाठी प्रशिक्षित आरोग्यसेविका व डॉक्टरांची गरज आहे. आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११३ पदे मंजूर आहेत. पण, अवघे ८९ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. अलीकडे जिल्हास्तर भरतीचे अधिकार मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने २४ डॉक्टरांची भरती केली. अजूनही काही आरोग्य केंद्रांना डॉक्टर नाहीत.
नागरिकांची सकारात्मक मानसिकता व्हावीप्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त आजारी लोकच सुश्रूषासाठी जात असतात. सुदृढ नागरिकांच्या मनात दवाखान्याविषयी असलेली नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य केंद्राऐवजी ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे नाव राहिल्यास चांगली धस्टपूस्ट लोकही आरोग्याची तपासणी करण्यासाठी तिथे जातील, हा यामागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.