औरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्की जवळील मेहमूद गेट (Mehmud Gate ) काही दिवसांपूर्वी एका वाहनाने दिलेल्या धडकेने कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना आज दुपारी बारापुल्ला गेटलाही ( Barapulla Gate) एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. यात गेटचे दगडी चिरे निखळून पडले असून मोठे नुकसान झाले आहे.
पाणचक्कीजवळील मेहमूद दरवाजा तीन वर्षांपासून दुर्लक्षित
शहरातील ऐतिहासिक ५२ गेट पैक्की आता मोजकेच चांगल्या स्थितीत आहेत.मिल कॉर्नरकरून छावणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऐतिहासिक बारापुल्ला गेट आहे. या मार्गावर मोठी वाहतूक आहे. गेटची नुकतीच डागडुजी करण्यात आली आहे. तसेच गेटच्या बाजूने काही दिवसांपूर्वीच एक पुल बांधण्यात आला आहे. छावणीकडून मिल कॉर्नरकडे येण्यासाठी अनेक वाहनचालक याचा वापर करत आहेत. मात्र,अद्यापही काही चालक कसलाही अंदाज न घेता बारापुल्ला गेटमधून जडवाहने नेण्याचा प्रयत्न करतात. आज दुपारी एका चालकाने मोठे कंटेनर गेटमधून नेण्याच्या प्रयत्न केला. यात कंटेनरची गेटला जोरदार धडक बसली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, गेटला मोठे नुकसान पोहचले आहे. गेटचे दगडी चिरे निखळून कोसळले आहेत. यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
हेही वाचा - औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड
काही बेशिस्त वाहनचालकांनी दिलेल्या धडकेमुळे मेहमूद गेटची वरची कमान कमकुवत झाली आहे. मेहमूद गेटमधून आज वाहतूक बंद आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करावी लागणार आहे. आता बारापुल्ला गेटचे नुकसान झाले आहे. शहराचा वारसा असलेली ऐतिहासिक गेट वाचविण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. गेटच्या अलीकडेच कमान लावून जड वाहनांचा प्रवेश रोखण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.