औरंगाबाद : नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाईन) होता येणार आहे. पुढील सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी दिली. होम क्वारंटाईन करण्याबाबत आजवर प्रशासनात समन्वयाचा अभाव होता. होम क्वारंटाईनचा निर्णय लवकर न घेतल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ज्या घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांची स्वतंत्र मोठी घरे आहेत, तसेच ग्रामीण भागातही ज्यांच्या शेतात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांना सोयीचे होणार आहे.
लोकप्रतिनिधींच्या सूचना अशा - खा. कराड म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या दररोज भेटी देण्यावर भर द्यावा. - खा. जलील म्हणाले, घाटी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून, तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. - आ. बागडे यांनी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाण्यास त्रास होत असून, आंबेडकर चौक ते पिसादेवी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली. - आ. दानवे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. - आ. सावे म्हणाले, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगारांची अँटिजन टेस्टची संख्या वाढविण्यात यावी. - आ. जैस्वाल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची व हर्सूल तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी केली.