छत्रपती संभाजीनगर : कधी अपुऱ्या निधीमुळे, तर कधी अर्जातील त्रुटींमुळे शैक्षणिक वर्ष लोटले, तरीही विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती प्रतीक्षाच करावी लागायची. आता या शिष्यवृत्तीसाठी ‘पॅन कार्ड’ आणि ‘कॅन्सल चेक’ जमा करण्याची अट लागू केल्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
इयत्ता अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी जे गुणवत्ता असतानाही शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अनेक विद्यार्थी किरायाने खोली घेऊन शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, सरकारी काम अन् सहा महिने थांब, या उक्तीचा प्रत्यय मागील अनेक वर्षांपासून ‘स्वाधार’च्या लाभार्थी विद्यार्थ्यांना येत आहे. शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही दोन-दोन वर्षे ही शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागारे कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. समाज कल्याण विभागाने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी कोषागारे कार्यालयाकडे सादर होईल. त्यासाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड, एक कॅन्सल चेक समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत वैयक्तिक खाते आहे; पण अनेकांकडे धनादेशाची सुविधा नाही. सर्वांकडे आधार कार्ड आहे, पण पॅन कार्ड काढलेले नाही. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
निधी प्राप्त आला अन् नवीन अटी लागू झाल्याशैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्च अखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू असतानाच ‘व्हीपीडीए’ ही नवीन पद्धत लागू झाली. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांना नवीन प्रणालीद्वारेच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.