औरंगाबाद : जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आता तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यात लवकरच ई-फेरफार प्रक्रिया लागू होणार आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफारला सुरुवात होत असून, त्यानंतर उर्वरित तालुक्यांमध्येही त्याची अंमलबजावणी होणार आहे.जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपासून सातबारा अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. खुलताबाद तालुक्यातील सर्व सातबारा अपडेट झाले असून, त्याचे संगणकीकरणही पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील कामही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जिल्ह्यात ई- फेरफार (आॅनलाईन म्युटेशन) प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम खुलताबाद तालुक्यात येत्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयाने ई-फेरफार ही आज्ञावली विकसित केली आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी, हवेली आणि पुणे शहर तालुक्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ई- फेरफार आज्ञावलीद्वारे तालुकास्तरावरील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे डेटा सेंटरद्वारे एकमेकांशी आॅनलाईन जोडले जाणार आहेत. तसेच गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयालाही या आज्ञावलीद्वारे जोडले जात आहे. त्यामुळे रजिस्ट्री कार्यालयात खरेदी-विक्रीचा व्यवहार होताच फेरफारची कार्यवाही आॅनलाईन सुरू होईल. सध्या नागरिकांना खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर मिळकतीला आपले नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागते. परंतु बऱ्याच वेळा तलाठी भेटत नाही किंवा भेटला तरी सातबारावर फेर घेण्यास टाळाटाळ होते. ई-फेरफारमुळे आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच भासणार नाही.कार्यवाही सुरू ई- फेरफारसाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. सर्व संबंधित कार्यालये सर्व्हरशी जोडण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफार प्रक्रिया सुरू होईल. उर्वरित तालुक्यांतही लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.- विक्रमकुमार,जिल्हाधिकारी, औरंगाबाद
आता फेरफार होणार आॅनलाईन...!
By admin | Published: August 03, 2014 12:55 AM