नागद ( औरंगाबाद ) : गौताळा घाटात ( Gautala Ghat ) आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास दरड कोसळली आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मागील आठवड्यात दरड कोसळ्याने औट्रम घाटातील ( Autram Ghat ) महामार्ग बंद आहे. याला पर्यायी रस्ता असलेल्या गौताळा घाटातसुद्धा दरड कोसळ्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मागील आठवड्यात दरड कोसळ्याने औट्रम घाटातील महामार्ग सध्या बंद आहे. यामुळे कन्नडपासून नागदमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. हा रस्ता गौताळा घाटातून जातो. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु ( Rain in Aurangabad ) असल्याने गौताळा घाटातील दरड आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोसळली. गौताळा अभयारण्य नागद विभागाचे वनक्षेत्रपाल (वन्यजीव) सागर ढोले यांनी सांगितले की, दरड वन विभागाचे कक्ष क्रमांक ५४८ व ५४९ या दोन्हींच्या सीमेवर कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सोनकांबळे यांनी गौताळा घाटात सततच्या पावसाने दरड कोसळली असून मदतीसाठी पथक पाठवले आहे. घाट रस्ता सुरु होण्यास वेळ लागणार असल्याची माहिती दिली आहे. मुसळधार पावसाने डोंगरावरील माती विरघळून दरड कोसळत आहेत. यापुढे अतिवृष्टी झाल्यास घाटात पुन्हा दरड कोसळ्याची शक्यता वाढली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, दरड कोसळल्याने गौताळा घाट देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाल्याने घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव
वाहतुकीवर मोठा परिणामऔट्रम घाटातील जाणारा महामार्ग धुळे, नंदुरबार, मालेगाव यासह इंदोर, सुरत या शहरांना जोडतो. दरड कोसळ्याने वाहतूक नागदमार्गे वळविण्यात आली. नागद येथून गौताळा घाटातून वाहतूक काही अंशी सुरळीत होत असताना आता या मार्गावर दरड कोसळली आहे. तसेच अतिवृष्टीचा इशारा असल्याने यापुढे या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसत आहे.