औरंगाबाद/उदगीर : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाने मागविल्यानंतर शासन स्तरावर उचित निर्णय होण्याची विनंती करणारे पत्र महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आले आहे. सदरील प्रस्तावाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दुजोरा दिला. मात्र, जिल्ह्याची निर्मिती कधी होणार, याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.
औरंगाबाद येथे १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला़ यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर नवीन जिल्हा निर्माण करण्याची प्रमुख मागणी केली. याशिवाय उदगीरला एमआयडीसी, शिरूर ताजबंद-उदगीर-तोगरी व आष्टा मोड-उदगीर-देगलूर या दोन रस्त्यांची दुरुस्ती व चौपदरीकरण, पशु विद्यापीठ उपकेंद्र व दूध भुकटी प्रकल्प सुरू करणे असे महत्त्वाचे विषय मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडून ते तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली होती.
या सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उदगीर जिल्हा निर्मिती व प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्यासंदर्भात व त्यावर उचित निर्णय घेण्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना २७ जानेवारी रोजी एका पत्रानुसार कळविले आहे.
१०० कोटींची होईल बचत राज्य सरकारने उदगीर जिल्हा निर्माण केल्यास आवश्यक नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या १०० कोटींची बचत होणार आहे. येथे श्यामलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाची १५० एकर जमीन व आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध असलेल्या इमारती चांगल्या स्थितीत आहेत. शिवाय, पशु वैद्यकीय महाविद्यालयाची ९०० एकर जमीन व या भागातील बांधकाम केलेल्या इमारती, सोमनाथपूर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली ३० एकर जमीन व इमारती, उदयगिरी महाविद्यालयासमोर असलेल्या कापूस संशोधन केंद्राची १५० एकर जमीन व इमारती, पंचायत समितीपासून ते पोलीस ठाण्यापर्यंत असलेली शासनाची जागा व इमारती आजघडीला उपलब्ध आहेत, अशी माहिती उदगीर जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील नेत्रगावकर व कार्याध्यक्ष रमेश अंबरखाने यांनी दिली.
आयुक्तालय विभाजनाचा अहवाल पडून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांसाठी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तालय आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी औरंगाबाद लांब पडत असल्यामुळे आयुक्तालय विभाजनाचा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला होता. या विभाजनाचा अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीने विभागीय आयुक्तालय कुठे करावे, यासाठी गोपनीय अहवाल देऊन साडेचार वर्षे झाले आहेत; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अहवालात लोकसंख्या आणि भौगोलिक निकषांचा विचार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालय करायचे की त्रिभाजन करायचे, याबाबत दिलेला तो अहवाल शासन पातळीवर तसाच पडून आहे.
असा असेल नवीन जिल्हालातूर जिल्ह्याचे विभाजन करून व मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सर्कल उदगीरला जोडून उदगीर नवीन जिल्हा निर्माण करण्याची २५ वर्षांपासूनची मागणी आहे़विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उदगीर जिल्हा निर्मिती व प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्यासंदर्भात प्रधान सचिवांना एका पत्रानुसार कळविले आहे.
किनवट, अंबाजोगाईचे काय?बीड / नांदेड : उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींनी वेग घेतला असतानाच नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १९९५ पासून किनवटवासीयांनी शासकीय स्तरावर ही मागणी लावून धरली आहे़ किनवट जिल्हा करून मांडवी व इस्लापूर हे दोन नवीन तालुके करण्याबाबत अनेक वेळा आंदोलने झाली आहेत़ एकीकडे बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी गेल्या ३५ वर्षांत हिंसक आंदोलनांसह शांततामय तथा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरूच आहेत. आजतागायत सहा मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. मात्र, किनवट आणि अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी पूर्ण झाली नाही.