औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसांची शहर आणि वाळूज परिसरात लागू केलेली संचारबंदी १८ जुलैच्या मध्यरात्री मागे घेतली जाणार आहे. १९ जुलै रोजी पहाटेपासून औरंगाबाद शहर आणि सर्व औद्योगिक परिसराची दैनंदिनी रुळावर येणार असून, पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
१९ जुलैपासून शहर व उद्योगांची दैनंदिनी कशी असेल, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे शनिवारी देणार आहे. मोकळ्या जागेतील वावर, सलून, ब्युटीपार्लर, सार्वजनिक बससेवा, सर्व किराणा दुकाने, सर्व प्रकारची बांधकामे, होम डिलिव्हरी सेवा यांना ९ जुलैपूर्वी जसे नियम होते ते नियम कायम राहणार आहेत. भाजीमार्केट, फळविक्रेते याबाबत आणि दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रस्त्यावर फिरू देण्याबाबत शनिवारी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण, डिजिटल, प्रिंट मीडिया कार्यालये सुरूच राहतील.दूध वितरणही सुरूच राहील. रविवारपासून सर्व पेट्रोलपंप सामान्यांसाठी सुरू होतील.
आता मनाचे लॉकडाऊन पाळावेविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे हे नागरिकांनी पाळावे. उद्योजकांनी आणि मोठ्या उद्योग, आस्थापनांना रविवारपासून व्हायरस पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वांना वागणे बदलावे लागेल. नियम पाळले नाही, तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल. १८ जुलैनंतर लॉकडाऊन वाढणार नाही. आता मनाचा लॉकडाऊन प्रत्येकाने पाळावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.
याबाबत राहू शकतो ‘जैसे थे’ निर्णय आठवडी बाजार, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, प्रवासी वाहने, खासगी बससेवा, वाहतूक वाहने, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्य, प्रेक्षागृह, सभागृह, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, प्रार्थना स्थळांबाबत निर्णय ‘जैसे थे’ राहणे शक्य आहे. ३१ जुलैनंतर याबाबत शासन निर्णय घेईल.
९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलतजिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, मनपा आयुक्तांनी शहराकरिता ९ ते १८ जुलैपर्यंत प्रतिबंध घातले होते, म्हणजे १८ जुलै रोजी त्यांनी घातलेले प्रतिबंध संपुष्टात येतील. ९ जुलैपूर्वी ज्या पद्धतीने सवलतींसह लॉकडाऊन सुरू होते, तीच परिस्थिती १९ जुलैपासून कायम होईल. पोलीस आयुक्तांकडून देखील असेच निर्णय असतील. सम-विषमबाबत शनिवारी निर्णय होईल. शासनाचे आदेश असल्यामुळे सम-विषम कायम राहील.
व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीचीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.