छत्रपती संभाजीनगर : देवघर असो वा अंगण; रांगोळी काढली तर ती मिटेपर्यंत तिथेच असते. तिला दुसरीकडे उचलून नेता येत नाही. मात्र, आता बाजारात ‘मोबाइल’ रांगोळी आली आहे. ही रांगोळी काढल्यावर तिला अलगद उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. एवढेच नव्हे तर अनेक दिवस ती रांगोळी टिकून राहते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.
‘मोबाइल’ रांगोळी विषयी जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता ताणली गेली असेल. मुंबईहून बाजारात एमडीएफ प्लेट आल्या आहेत. या प्लेटमध्ये आधीच डिझाईन करून ठेवलेली असते. २० प्रकारच्या डिझाइनच्या प्लेट उपलब्ध झाल्या आहेत. यातील खाचामध्ये वेगवेगळ्या रंगांची रांगोळी भरली की, डिझाईन खुलून दिसते. ही प्लेट उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. यामुळे महिला वर्गात या रांगोळी प्लेट खास पसंत केल्या जात आहेत.
८ ते १४ इंचीपर्यंतच्या रांगोळी प्लेटरांगोळीच्या प्लेट बाजारात मोठ्या संख्येने आल्या आहेत. यात ८ इंच, १० इंच, १२ इंच व १४ इंचांपर्यंत विविध आकारांतील प्लेट मिळत आहेत. साधारणत: ६० ते ३०० रुपयांपर्यंत किंमत आहे.
अपार्टमेंटमध्ये मोबाइल रांगोळीला जास्त पसंतीरांगोळीसाठी एमडीएफ प्लेट बाजारात आल्या आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. खास करून अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलांकडून या प्लेटला मागणी जास्त आहे. दिवसभर दरवाजा समोर ठेवून रात्री त्या प्लेट घरात आणल्या जातात. पुन्हा सकाळी दरवाजासमोर ठेवली जाते.- राहुल गुगळे, व्यापारी
५०० टन रांगोळीने सजणार अंगणछोटा उदयपूर (गुजरात) व अली राजपूर (मध्य प्रदेश) या शहरातून छत्रपती संभाजीनगरात ५०० टन रांगोळी दाखल झाली. यात ३०० टन पांढरी रांगोळी तर २०० टन रंगीत रांगोळीचा समावेश आहे. रंगीत रांगोळीतही २३ रंग बघण्यास मिळत आहेत. मागील १५ वर्षांपासून मार्बलच्या चुऱ्यापासून रांगोळी तयार केली जाते. डिस्टेंपरच्या कंपनीत रांगोळी रंगीत केली जाते.पांढरी रांगोळी १० रुपये किलो तर रंगीत रांगोळी २० ते ३० रुपये किलोने विकली जात असल्याची माहिती होलसेलर जयराज साहुजी यांनी दिली.