छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रत्येक मालमत्तेवर आता क्यूआरकोड असलेला डिजिटल ॲड्रेस बोर्ड लावण्यात येणार आहे. एका खासगी बँकेने सीएसआर फंडातून हे काम करण्याचे निश्चित केले. बँकेने रायपूर येथे काम केलेल्या नामांकित कंपनीचीही नेमणूक केली. मंगळवारी महापालिकेने खासगी बँकेला काम सुरू करण्याचे आदेश दिले. नऊ ते बारा महिन्यांत काम संपविण्याचे निर्देशही देण्यात आले.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक घरावर डिजिटल ॲड्रेस नंबर असलेला बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपासून या कामाची प्रक्रिया सुरू होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रायपूर येथे या कामाची पाहणी सुद्धा केली होती. या डिजिटल ॲड्रेसचे फायदे बरेच आहेत. एखाद्या व्यक्तीला घराचा पत्ता द्यायचा द्यायचा असेल तर क्यूआर कोडवरून तो थेट घरापर्यंत येऊ शकतो. महापालिकेच्या विविध सेवा, अनेक सुविधा पुरविण्यासाठीदेखील याचा फायदा होणार आहे.
या उपक्रमासाठी खासगी बँकेने होकार दिला. काही दिवासांपासून महापालिका व बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. मंगळवारी बँकेला महापालिकेने कार्यारंभ आदेश दिले. बँक एका खासगी कंपनीच्या सहकार्याने बोर्ड तयार करून नागरिकांच्या घरांवर लावणार आहे. हे काम नऊ महिने ते एक वर्षापर्यंत चालणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अंकित पारे, कार्यकारी उपाध्यक्ष एजाज आदिल, खासगी कंपनीचे प्रमुख मोहित चेलारामाणी यांची उपस्थिती होती.