छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कराची वसुली दरवर्षी १५० कोटींवर जात नाही. महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कराच्या वसुलीवर प्रशासक जी. श्रीकांत यांनी लक्ष केंद्रित केले. जीएसटी विभागातील तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी प्रतिनियुक्तीवर महापालिकेत घेतले. ज्या पद्धतीने जीएसटीची १०० टक्के वसुली केली जाते, त्याच धर्तीवर मालमत्ता कराची वसुली सुरू करण्यात आली. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले. तिजोरीत दररोज ४५ ते ५० लाख रुपये येत आहेत.
शहरात किमान ४ लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. महापालिकेच्या दप्तरी १०० टक्के मालमत्तांची नोंद नाही. अनेकदा सर्वेक्षण करून कर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. सध्या मनपाकडे नोंद असलेल्या मालमत्ताधारकांकडून शंभर टक्के चालू आर्थिक वर्षाचा कर, मागील थकबाकी जमा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. या कामासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी जीएसटी विभागातील तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणले. स्वत: जी. श्रीकांत यांना जीएसटीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. त्यांनी जीएसटीमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वसुलीवर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक झोन कार्यालयाअंतर्गत किती मालमत्ता आहेत, कर्मचाऱ्यांवर संबंधित मालमत्तांच्या करवसुलीची जबाबदारी सोपविली. कोणाकडे किती थकबाकी आहे, हे आता एका ‘क्लिक’वर निदर्शनास येऊ लागले. या शिवाय १ ते १० लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांची यादी करण्यात आली. त्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे नागरिक थकीत करही भरू लागले आहेत.
२५ लाखांवरून ४५ लाखमालमत्ता कराची वसुली पूर्वी दररोज २५ लाख रुपये हाेत होती. आता ती दररोज ४५ ते ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. वसुलीचा आलेख पाहता त्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. डिसेंबरपासून दरवर्षी वसुलीला अधिक गती येते.
७८ कोटी ८० लाख वसूलयंदा चालू आर्थिक वर्षातून २५० कोटी रुपये मालमत्ता करातून मिळावेत, असे प्रशासनाने गृहीत धरले आहे. थकबाकीतून १०० कोटींची अपेक्षा प्रशासनाला आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता करातून ७८ कोटी ८० लाख रुपये मनपाला मिळाले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा चांगला असल्याचे सूत्रांचे मत आहे.