बीड : गुटखाबंदी असतानाही जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची अवैध विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे गुटखा विक्रेत्यांनी आता ठराविक ग्राहकांनाच गुटखा देणे सुरू केले असून यासाठी वेगवेगळे पासवर्ड वापरले जात असल्याची माहिती मंगळवारी समोर आली. यावर कारवाई करण्यास अन्न औषध प्रशासन व पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.मागील काही वर्षांपासून सर्वत्रच गुटखाबंदी सुरू आहे. परंतु बीड जिल्हा याला अपवाद आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या सहकार्याने सर्रास गुटख्याची विक्री केली जात आहे. टपरी, दुकान, हॉटेल आदी ठिकाणी गुटखा विक्री होताना दिसून येत आहे. आपण गुटखा विक्री करीत असल्याचे समजू नये म्हणून टपरीचालकांनी ग्राहकांना वेगवेगळे पासवर्ड दिले आहेत. ठराविक ग्राहकांनाच गुटखा दिला जात असल्याचे दिसून येते.सहयोगनगर भागातील एका टपरीवर दुकानातील सामान जसे बांधून दिले जाते त्याप्रमाणे गुटख्याची पुडी बांधून दिली जाते. याची किंमतही ठरवली जाते. दूरवरून ग्राहक दिसताच त्याला टपरीच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे केसात हात फिरवून जाण्यास सांगितले जाते. हा पासवर्ड शहरातील पेठ बीड भागातही वापरला जात असल्याचे दिसून येते.अन्न प्रशासन व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील काही टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे यातील ग्राहक पोलीस व इतर शासकीय कर्मचारी असल्याचे दिसून येते. या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्यास अन्न प्रशासनाचे अधिकारी आपल्याकडे मनुष्यबळ नाही असे सांगून टाळाटाळ करतात. हाच फायदा घेत गुटखा विक्रेत्यांचे दिवसेंदिवस फावत आहे.अन्न प्रशासनातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील गुटखा विक्री संदर्भात कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. पोलिसांवर जबाबदारी ढकलून ते अंग काढून घेत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी व व्यसनाधिनतेला आळा बसवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)
गुटखा विक्रीसाठी आता ‘पासवर्ड’ !
By admin | Published: September 09, 2015 12:06 AM