करंजखेड : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील कर कमी असल्याने पेट्रोलचे दर शंभर रुपयांपेक्षा कमी होते. परंतु, शनिवारी अचानक यात वाढ झाली असून पेट्रोलने शंभरी पार केली. त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहने वापरावी की नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे. शासनाने हे दर कमी करावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
डिझेल महागल्यामुळे शेतकरी अडचणीत
खरिपाची कामे सध्या जोमाने सुरू आहेत. ट्रॅक्टरने नांगरणे, मोगडणे, रोटा आदी कामे केली जातात. परंतु, डिझेलच्या किमती वाढल्याने ट्रॅक्टरचालक व मालकांनी कामाच्या किमतीत वाढ केली. परिणामी शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसू लागला आहे. त्या प्रमाणात शेतीमालाच्या किमती का वाढत नाही, असा प्रश्न देखील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.