औरंगाबाद : सिल्व्हर कोटेड पत्रावळी, प्लास्टिकच्या ग्लासवर बंदी आल्याने आता विक्रेत्यांनी पर्याय शोधणे सुरूकेले आहे. येत्या १५ दिवसांत मक्याच्या पानापासून बनलेल्या पत्रावळी बाजारात आणण्यात येणार आहेत. मात्र, या पत्रावळी महाग असल्याने त्या किती प्रमाणात स्वीकारल्या जातील, याबाबत शंका आहे.
श्रावण महिन्याला १२ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर सणासुदीला सुरुवात होत आहे. उपवास, भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम चातुर्मासात असणार आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण त्यानंतर आहेत. यानिमित्ताने पत्रावळी व ग्लासला मोठी मागणी राहणार आहे. पूर्वी बदामाच्या पानाच्या पत्रावळी विकल्या जात नंतर त्या पत्रावळी शिलाई करून येऊ लागल्या होत्या; पण नंतर त्याची जागा सिल्व्हर कोटेड व थर्माकोलच्या प्लेटने घेतली.
आता, प्लास्टिक व थर्माकोलवर राज्य सरकारने बंदी आणली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आता नवीन पर्यायी शोधणे सुरू केले आहे. सिल्व्हर कोटेड पत्रावळीऐवजी आता मक्याच्या पानाची पत्रावळी तसेच सुपारीच्या पानाची पत्रावळी बाजारात दाखल होत आहे. ६ ते ९ रुपये प्रतिनग, अशी या पत्रावळीची किंमत आहे. यासाठी स्वस्त असणाऱ्या बदामाच्या पानाच्या पत्रावळी मागविण्यावर व्यापाऱ्यांचा भर दिसून येतो. मात्र, संपूर्ण राज्यातून या पत्रावळीला मागणी वाढल्याने ओडिसात बदामाच्या पत्रावळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कागदाच्या ग्लासला चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
केळीच्या पानालाही येणार भाव शहरात खान्देशातून केळीची पाने विक्रीसाठी येत असतात. घरगुती धार्मिक कार्यात आवर्जून केळीची पाने मागविली जातात. श्रावणात मोठ्या प्रमाणात केळीची पाने शहरात येत असतात. यावेळी केळीची पानेही महाग होतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.
रद्दीचे भाव वाढले कॅरिबॅगवर बंदी आहे. हँडल नसलेल्या किराणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॅगवर बंदी आहे की नाही, याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक बॅगवरही कारवाई करणार का, याविषयी मनपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक किराणा दुकानदारांनी आज पेपरच्या पुड्यात किराणा सामान बांधून देणे सुरू केले होते. त्यामुळे रद्दीला मागणी वाढली. १० किलोची रद्दी २५० रुपयांना विकली जात होती. २५ रुपये किलोपर्यंत रद्दीचा भाव गेला होता. काही व्यापाऱ्यांनी तर शहराबाहेरील रद्दीवाल्यांकडे फोन लावून रद्दी काढून ठेवण्यासाठी आॅर्डर दिली. मात्र, एका रद्दी विक्रेत्याने सांगितले की, आम्ही १० रुपये किलोने रद्दी खरेदी करीत आहोत. १५ ते १६ रुपये किलोने विकत आहोत. काही जणांनी संधीचा फायदा घेऊन २० ते २५ रुपये किलोपर्यंतही रद्दी विकली.