औरंगाबाद : आॅल आऊट या सर्च आॅपरेशनमध्ये प्रत्येक वेळी तडीपारांचाच सर्रास वावर आढळून आला. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी करडी नजर केली असून, चौकाचौकात डिजिटल बॅनरवर त्यांचे नाव व फोटो लावून जनतेला सतर्क करण्याची गुन्हे शाखेची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.
शहरातील विविध गुन्हेगारी कारवाईत अनेकदा समज देऊनही गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याचे गुन्हे शाखेच्या लक्षात आले आहे. शहरातील काही ठिकाणी तडीपार राजरोषपणे वावरताना दिसून येत आहेत. शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही नियमाचे उल्लंघन केल्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. ८२ लोकांची लिस्ट असून, गुन्हेगारीवर अंकुश घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने सीसीटीव्हीने शहर जोडणे सुरू केले, विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत, त्यामुळे बहुतांश गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी पोहोचेपर्यंत ड्रोणदेखील वापरणार आहे, अशा विविध उपाययोजना आखल्या आहेत.
आॅल आॅऊट आॅपरेशनमध्ये प्रत्येक वेळी तडीपार अस्तित्व व ओळख लपवून राजरोसपणे शहरात वावरत आहेत. त्यावर एकच शक्कल पोलिसांनी लढविण्याचे ठरविले आहे, त्यावर सध्या उच्च स्तरीय विचारमंथन व कायदेशीर बाजूदेखील वरिष्ठांनी तपासल्या असून, आता गुन्हे शाखेकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. वसाहतीतून गुन्हेगार व्यक्तीचा संचार व गुन्हेगारी कारवाई करण्याच्या हेतूने फिरणारी व्यक्ती दिसली, तर विशेष पोलीस अधिकारीच नव्हे, तर सामान्य नागरिकदेखील पोलिसांना फोन करून माहिती सांगू शकतात. त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवळता येतील, हा यामागील हेतू असल्याचे वरिष्ठ अधिका-यांचे मत आहे.
आठवडाभरात बॅनर्स लागतील...कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी कारवाया रोखणे गरजेचे आहे. राजरोसपणे शहरात फिरणाºया तडीपारांवर अंकुश ठेवण्याकरिता त्यांचे फोटोसह नाव असलेले बॅनर्स शहरातील विविध चौकांत लावण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर यामुळे वचक बसणार असून, गुन्हेगारी कारवाईवर अंकुश बसणार आहे. सध्या शहरात ८२ तडीपारांची यादी असल्याचे समजते, वेळप्रसंगी पूर्वपरवानगीशिवाय तुम्हाला प्रतिबंधित हद्दीत येता येत नाही, तरीदेखील काही आरोपी शहरात गुन्हेगारी कारवाईच्या उद्देशाने येत असल्याचा संशय आहे. त्याकरिता फोटो व नाव असल्याने मुदतपूर्व गुन्हेगार येणार नाही, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.