छत्रपती संभाजीनगर : अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे मोठे फॅड आले आहे. त्यासाठी सधन विद्यार्थी गाव सोडून शहरातील अभ्यासिकांच्या माध्यमातून या परीक्षेची तयारी करतात. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील १९ गावांमध्ये अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपयांचा निधीची तरतूदही केली आहे, हे विशेष!
अलीकडे शिक्षण घेतल्यानंतरही पूर्वीसारख्या लगेच नोकरी मिळत नाहीत. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर धारक बेरोजगारांचे तांडे निर्माण होत आहेत. ही बाब ओळखून विद्यार्थ्यांचा कल एमपीएससी, यूपीएससी, बँक, एलआयसी तसेच अन्य काही पदांच्या परीक्षेकडे वाढला आहे. मात्र, सधन विद्यार्थी शहरामध्ये येऊन या परीक्षेची तयारी करतात. मात्र, गरीब विद्यार्थ्यांना इच्छा असूनही कोचिंग तसेच अभ्यासिकेची सुविधा मिळत नाही, ही बाब ओळखून सीईओ मीना यांनी नागरी सुविधांसाठी मिळणाऱ्या निधीतून जिल्ह्यात मोठ्या गावांमध्ये सुसज्ज अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी प्रतिअभ्यासिकेवर जिल्हा परिषद २० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यात ग्रामपंचायती आणखी पाच लाख रुपयांचा निधी टाकून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुसज्ज अभ्यासिकेचा कक्ष, विविध पुस्तके, टेबल-खुर्ची, फॅन आदी सुविधा देऊ शकते. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असेल, असे सीईओ मीना यांनी सांगितले.
डिसेंबरअखेरपर्यंत अभ्यासिका सुरू होतीलयासंदर्भात सीईओ मीना यांनी सांगितले की, या उपक्रमावर आपण विशेष लक्ष देणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात अभ्यासिका सुरू होतील. या अभ्यासिका औरंगाबाद तालुक्यात तिसगाव, सावंगी (हर्सूल), गोलटगाव, चौका, फुलंब्री तालुक्यात बाबरा, सिल्लोड तालुक्यात बोरगाव सारवणी, उंडगाव, सोयगाव तालुक्यात फर्दापूर, कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी, कुंजखेडा, नागद, करंजखेडा (जा), पैठण तालुक्यात दावरवाडी, बालानगर, विहामांडवा, चितेगाव, गंगापूर तालुक्यात सावंगी (लासूर स्टेशन) आणि वैजापूर तालुक्यात बोरसर व वाकला या मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.