स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य
औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाददरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेस्टेशनवर सध्या विद्युत खांबांवर केबल टाकण्याचे काम सुरू झाले असून, महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. येत्या अडीत ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते. त्यानुसार हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. औरंगाबादेत खांब (पोल) उभारण्यात आल्यानंतर विद्युत यंत्रणेचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीरीत्या झाली आहे.
औरंगाबादहून लवकरच चाचणीविद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने रेल्वे रुळाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.