औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतल्यानंतर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील याठिकाणी बैठक घेण्यासाठी सरसावले आहेत. मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्यप्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादेत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असून, यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागातील लोकप्रतिनिधींची बैठक येथे होते. ती बैठक सहा महिने किंवा एक वर्षाच्या अंतरात धोरणानुसार होते. आजवर नांदेड येथे ती बैठक घेतली जात होती. औरंगाबादेत दोन दशकांपूर्वी अशी बैठक झाल्याचे सांगण्यात येते.
या बैठकीत नवीन रेल्वेमार्ग, रेल्वे सेवा, स्थानकांतील सेवा, प्रवासी सुविधांसह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असते. खांडवा, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबादचे लोकप्रतिनिधी त्या बैठकीला सोयीनुसार उपस्थित राहतात. लातूरचे लोकप्रतिनिधी सिकंदराबादला जातात. जिल्ह्यातील रेल्वे प्रस्ताव आणि सुविधा, समस्यांचा आढावा ‘दमरे’चे महाव्यवस्थापक घेतात. त्यानंतर सूचनांवर कार्यवाही केली जाते, असे या बैठकीचे स्वरूप आहे.
दरम्यान, खा. इम्तियाज जलील म्हणाले, नांदेड येथे पुढच्या महिन्यात बैठक होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. औरंगाबादेत बैठक होईल, असे अजून तरी कळालेले नाही.