औरंगाबाद : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जातींमधील युवकांना चारचाकी वाहनचालक परवाना व प्रशिक्षण देऊन रोजगार संधी उपलब्ध करण्याची संधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणणे जिल्हा परिषदेने या योजनेला आदित्य ठाकरे युवा वाहन चालक परवाना प्रशिक्षण योजना असे नाव दिले आहे. एखाद्या युवा नेत्याच्या नावे योजना सुरु करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असल्याने यावरून आता चर्चेला उधान आले आहे.
कोणताही पक्ष सत्तेत आल्यास आपल्या कामाचा ठसा कायम राहावा यासाठी विविध शासकीय योजना जाहीर करते. या योजनांना एखाद्या महापुरुषाचे किंवा राजकीय नेत्याचे नाव दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. किंवा नवे सरकार जुन्याच योजनांचे नावे बदलून त्या नव्या नावाने लागू करण्याचा सुद्धा ट्रेंड आला आहे. यातून त्या महापुरुषाचे किंवा नेत्याचे नाव तर स्मरणात राहतेच शिवाय जनतेतसुद्धा पक्षाची चर्चा राहते असे दुहेरी हेतू साध्य केला जातो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कृषी योजना आणि शरद पवार यांच्या नावे ग्रामसमृद्धीची योजना जाहीर केली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेने पुढचे पाऊल टाकत शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावे एक योजना जाहीर केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जातींमधील युवकांना चारचाकी वाहनचालक परवाना व प्रशिक्षण देऊन रोजगार संधी उपलब्ध करण्याची संधी या मार्फत उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेने २०२०-२१ मध्ये यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. १० वी नापासपेक्षा अधिक अर्हता असलेल्यांना या योजनेतून लाभ घेण्यासाठी संबंधित पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केले आहे.