लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शंभर टक्के डिजिटल शाळांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत १०० टक्के शाळा प्रगतसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. प्रगतच्या नियोजनासंदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर बैठका घेण्यात येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी ३० जून रोजी दिली. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात असून संबंधित यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. जि. प. च्या एकूण ८८३ तर खाजगी २२६ शाळा जिल्ह्यात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेच्या एकूण ५१५ शाळा प्रगत असल्याची नोंद शिक्षण दरबारी आहे. तसेच खाजगी ६२ शाळा प्रगत असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. उर्वरित संपूर्ण शाळा शंभर टक्के प्रगत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणच्या शंभर टक्के प्रगत शाळा आहेत, तेथील यंत्रणेची मदत यावेळी घेतली जाणार आहे. शिवाय कार्यशाळा भरवून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ जुलैपासून बैठका निश्चित केल्या जाणार आहेत.
आता शाळा शंभर टक्के ‘प्रगत’कडे वाटचाल
By admin | Published: June 30, 2017 11:23 PM