छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीमध्ये संघाच्या लोकांना घुसविण्याचा प्रयत्न एस.पी. गायकवाड यांनी केल्याचा आरोप करत वयोमानानुसार गायकवाड हे संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा. यापुढे संस्थेची सूत्रे बाबासाहेबांच्या वंशजांकडे सन्मानपूर्वक सोपविण्यात यावीत, असा सूर पीईएस बचाव आंदोलन समितीच्या बैठकीतून निघाला.
‘पीईएस’ बचाव आंदोलन समितीच्या वतीने रविवारी मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बैठकीत माजी प्राचार्य डॉ. एम.ए. वाहुळ, दिनकर ओंकार, मुकुंद सोनवणे, दौलत मोरे, प्रा. भारत सिरसाठ, सचिन निकम, विजय वाहूळ, संतोष भिंगारे, गुणप्रिया गायकवाड यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ‘पीईएस’ला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी व्यापक लढा उभारावा, अलिकडे नागसेनवन परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे, प्राचार्य-कर्मचारी मनमानी करत असल्याने विद्यार्थी संख्या रोडावली आहे. विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. याचा जाब आता प्रचार्यांना विचारला जाईल, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध प्रकरणांमध्ये निकाल देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. परिणामी, संस्थेची वाताहत होत असून या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.