औरंगाबाद : आम्ही देशाच्या संविधानिक आणि लोकशाही मूल्यांचे तत्वतः पालन करणारे आंबेडकर अनुयायी आहोत. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा'चे आम्ही स्वागतच केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले भारतीय संविधान नसते तर या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नसता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता साजरा झालाय, 2025 दरम्यान संविधानाचा अमृत महोत्सव आहे. त्यावेळी सरकारने 'हर घर संविधान'देऊन संविधानिक मूल्य बळकट करावेत, अशी अपेक्षा आंबेडकरी चळवळीच्या नेत्या तथा जेष्ठ पत्रकार मंगल खिंवसरा यांनी (15 ऑगस्ट) व्यक्त केली.
संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष माधवराव बोरडे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (१५ ऑगस्ट) भीमनगर येथील माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या संपर्क कार्यालयात नेत्रचिकीत्सा शिबीर व चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष विठाबाई बोरडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीशचंद्र वठार, माजी नगरसेवक प्रेमलता दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी दहा वाजता नंदनवन कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ अभिवादन सभा झाली.
महात्मा फुले चौकात सकाळी अकरा वाजता ७४ रोपे लावण्यात आली. त्यानंतर शिबिराचे उदघाट्न झाले. त्यावेळी खिंवसरा म्हणाल्या, ' सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आपण वाचन बंद केल्यामुळे आपल्या चळवळीसमोर नवे आव्हाने उभी राहिली आहेत. बालपनापासूनच वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर आपल्याला बाल ग्रंथालये सुरू करावे लागतील. बोरडे प्रतिष्ठानतर्फे सातत्याने लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. प्रतिष्ठाननेच यापुढे सरकारच्या आधी 'हर घर संविधान' आणि बाल ग्रंथालय सुरू करावेत, असे आवाहनही खिंवसरा यांनी केले. बोधिपालो महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. डॉ. यशवंत कांबळे, ऍड. धनंजय बोरडे, कडुबा तुपे, शेख अफसरभाई, प्रशांत इंगळे, मुकुल निकाळजे, ऍड. अमोल घोबले, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.