छत्रपती संभाजीनगर : आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गावागावांतील बचत गटांच्या क्रियाशील आणि शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ (बँक करस्पाँडन्स) नियुक्त करणार आहे. ज्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी दैनंदिन कामधंदा सोडून ग्रामस्थ तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांना जावे लागणार नाही. यासाठी जागतिक महिला बँकेने औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे.
सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) १६ हजार २९५ बचत नोंदणीकृत आहेत. हे सर्व बचत गट ग्रामीण भागात लहान-मोठे उद्योग व्यवसाय करीत असून, त्यांना बँकेमार्फत अर्थसाहाय्य करण्यात येत आहे. तथापि, सध्या जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये अथवा ग्रामपंचायतीच्या ठिकाणीच बँका उपलब्ध आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज सोडून अनेक नागरिक तसेच बचत गटांच्या महिलांना बँकेत जाणे जमत नाही. जर एखादी सुशिक्षित महिला बँकेचे व्यवहार करण्यासाठी सुज्ञान असेल, तिच्याकडे बँकेची सेवा देण्यासाठी लॅपटॉप, संगणक, थंब इम्प्रेशन मशीन, स्वतंत्र छोटीशी खोली असेल, अशा महिलेस ‘बीसी सखी’ नियुक्त करण्यासाठी ‘डीआरडीए’ प्राधान्य देणार आहे.
नियुक्त ‘बीसी सखी’ बँकेत पैसे भरणे, काढणे, कर्ज प्रकरणाचे अर्ज भरून देणे, आधार कार्ड, पॅन कार्ड काढण्याचे अधिकृतपणे काम करतील. यामाध्यमातून त्यांना चांगले अर्थार्जनही होईल. सध्या जिल्ह्यात बचत गटांच्या ८१ महिला ‘बीसी सखी’ म्हणून यशस्वीपणे काम करीत आहेत. अशा ‘करस्पाँडन्स’ नेमण्याच्या रिजर्व्ह बँकेच्या बँकांनाही मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार ‘डीआरडीए’मार्फत जुलै महिन्यात या ‘बीसी सखी’ नियुक्त करण्यासाठी शिफारस केली जाणार आहे.
अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन देणारजिल्ह्यात १ लाख ६० हजार २९५ कुटुंबे असून, ‘डीआरडीए’ने या कुुटुंबाचे आर्थिक स्थितीबाबतचे सर्व्हेक्षण केले आहे. यात २५ हजार रुपयांपर्यंत उलाढाल असलेली जिल्ह्यात २ टक्के कुटुंबे असून, ६० हजारापर्यंत ४१ टक्के, १ लाखापर्यंत ३४ टक्के आणि एक लाखांहून अधिक २३ टक्के कुटुंबे आहेत. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून २ टक्के व ४१ टक्के या वर्गवारीत असलेल्या १ लाख ९ हजार ७४२ कुटुंबांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी त्यांच्यात लहान-मोठे उद्योग व्यवसायांसाठी प्रबोधन करत आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना बँकेचे अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.- संगीतादेवी पाटील, प्रकल्प संचालक, डीआरडीए