छत्रपती संभाजीनगर : वाढत्या गर्दीत चोऱ्या होऊ नयेत म्हणून सातारा खंडोबा मंदिरात ट्रस्टींनी भाविकांच्या सोयीसाठी दानपेटीवर क्यूआर कोड डकविले आहेत. यावरून ‘आता देवही तंत्रस्नेही झालेत, करा स्कॅन’ असे शब्द मंदिरात ऐकायला मिळत होते.
चंपाषष्ठीला मंदिरात अधिक गर्दी असल्याने सहकुटुंब मंदिरात पूजेसाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी दर्शनासाठी नवजोडप्यांची मोठी गर्दी दिसत होती. देणगीची पावती फाडणाऱ्यांचीही गर्दी असते, दान देताना स्कॅनर नाही का, असेही अनेकदा भाविक विचारतात, त्यामुळे विश्वस्तांनी ऑनलाइनची व्यवस्था केल्याने भाविकांत समाधान दिसत आहे. मंदिराच्या दोन्ही दानपेट्या तसेच दरवाजे व अशा दहा ठिकाणी स्कॅनरचे फलक लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे दानपेटीत ऑनलाइन भर पडणार असल्याचे ट्रस्टींचे म्हणणे आहे.
सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, केंद्रे, उदावंत, विशेष शाखेचे कारभारी नलावडे यांच्यासह पथकाने भेट देऊन चर्चा केली व मंदिरात आरतीही केली. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर, ट्रस्टी सोमीनाथ शिराणे, आबा चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सेल्फीवर भर...पूर्वी यात्रेत फोटो काढून घेतले जात होते, आता तर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने शहरातच नव्हे तर खेड्यातून दर्शनाला आलेल्या वयोवृद्ध असो की महिला, मुली; सेल्फी काढण्याचा मोह बहुतेकांना आवरता आला नाही.
रविवार अन् सोमवारीदेखील खंडोबा मंदिरात दर्शनाला रांगारविवारी आणि सोमवारी सुटी असल्याने भाविकांनी सातारा येथे खंडोबा मंदिरात गर्दी केली होती. सलग दोन सुट्या आल्याने शाळकरी मुलांसह पालक मंदिरात दर्शनासाठी दिसत होते. चंपाषष्ठीची यात्रा संपल्यावर गर्दी होणार नाही असे वाटत होते. त्यामुळे आता थांबलेल्या मंदिराच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याची ठेकेदाराला सूचना देण्याच्या तयारीत असताना गर्दीमुळे खासगी सुरक्षारक्षक तसेच स्वयंसेवकांना बोलावण्याची वेळ आली.