छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि भाजपची युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे ठाकरे गटाचे १८ खासदार, विधानसभेत ५५ आमदार निवडून आले. आता त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आणून दाखवावा. असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले. चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजप विभागीय कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची यावेळी उपस्थिती होती.
ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांची निवडणुकीच्या निकालावर काही प्रतिक्रिया आली नाही. यावर महाजन म्हणाले, ते वाचाळवीर असून त्यांना निकालामुळे मोठी चपराक बसली आहे. त्यांनी या निवडणुकीवरून बेताल वक्तव्ये केली, ते आता तोंडघशी पडले आहेत.
देशाला पनौती कुणाची आहे आणि गॅरंटी कुणाची आहे. हे निकालावरून दिसले आहे. तेलंगणा भाजपच्या हातून का गेले, त्या राज्यात आमचे काहीही काम नव्हते. संघटन देखील मजबूत नव्हते. त्यामुळे आम्ही तेथे निवडून येऊ, असा दावा केला नव्हता. उर्वरित तीन राज्यांवर आमचा दावा होता. काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा कोणताही परिणाम निवडणुकीवर नव्हता, इंडिया आघाडीचा पराभव झाला असून एक्झिट पोल फोल ठरले आहेत. लोकसभेची पूर्वपरीक्षा झाली असून भाजपचे ३४० ते ३५० खासदार लोकसभेत निवडून येतील. राज्यातही भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल. असा दावा त्यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे....मराठा समाजाला कायदा, नियमांत बसणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. २४ डिसेंबरनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. यावर महाजन म्हणाले, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु सरकार ओबीसी समाजासह कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. जरांगे यांची सरसकट आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होणे शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे, असे महाजन म्हणाले.