छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी साधारणपणे १५ ऑक्टोबरपासूनच कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडविण्यासाठी गेट टाकले जातात. मात्र, यंदा जिल्ह्यातील तब्बल ८० टक्के बंधारे कोरडेठाक आहेत. तथापि, परतीचा पाऊस झाल्यास त्या पाण्याचा रब्बी हंगामात सिंचनासाठी थोडासा का होईना फायदा होईल, या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंमाम तर गेलाच, आता रब्बीचे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अल्प पावासामुळे बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही कोरडेच आहेत. वास्तविक, साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून गेट टाकून कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वाहते पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता बंधाऱ्यांतच पाणी नाही, तर गेट टाकून फायदा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे हे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले. त्यामुळे यापूर्वी अनेक वर्षे गेटअभावी बंधाऱ्यांतील पाणी वाहून जात असे. सद्य:स्थितीत ५८५ बंधाऱ्यांसाठी साधारणपणे १८ हजार गेटची गरज असून, सिंचन विभागाकडे सुमारे १५ हजार गेट उपलब्ध आहेत. उर्वरित २७०० नवीन गेट तयार करून ते बंधाऱ्यांना बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार पुरवठादारांनी बंधाऱ्यांच्या ठिकाणी गेट उपलब्ध करून दिले आहेत. काही गेट टाकले; पण अनेक गेट टाकलेले नाहीत.
१५ ते २० टक्के बंधाऱ्यांत पाणीवरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे त्या परिसरातील बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे. तेथील बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविण्यात यश आले आहे; पण छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील बंधारे कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील अवघ्या १५ ते २० टक्के बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे.