औरंगाबाद : अवघ्या भारतातील पर्यटन स्थळे सुरू झाली. महाराष्ट्रातही रायगड किल्ला, एलिफंटा केव्ह सुरू झाल्या. मग जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे असलेल्या अजिंठा- वेरूळ लेणीबाबतच हा अन्याय का, असा सवाल औरंगाबादच्या पर्यटन व्यावसायिकांनी केला. तसेच आता जर पर्यटन स्थळे सुरू झाली नाहीत, तर शेतकऱ्यांप्रमाणे पर्यटन व्यावसायिकांच्याही आत्महत्या झाल्याच्या बातम्या ऐकाव्या लागतील, अशा शब्दात पर्यटन क्षेत्रातील भीषणता समोर आणली.
आता तरी शासनाने पर्यटन जगताची हाक ऐकून पर्यटन स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी औरंगाबादच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्वच संस्थांतर्फे शुक्रवार, दि. २७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. टूर ऑपरेटर जसवंत सिंह राजपूत, रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेल असोसिएशनचे सुनील चौधरी, एलोरा गाइड असोसिएशनचे आमोद बसोले, अजिंठा गाइड असोसिएशनचे अबरार हुसैन, शॉपकिपर्स ॲण्ड हॉटेल असोसिएशनचे मकरंद आपटे, शॉपकिपर असोसिएशनचे पपिंद्रपार यांची उपस्थिती होती.
काळ्या फिती लावून निषेधपर्यटन व्यावसायिकांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पर्यटन सुरू करावे, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आतापर्यंत नानाप्रकारे शासनाला साकडे घातले आहे; परंतु या मागण्यांकडे सर्रास कानाडोळा केला जात असल्याने दि. २७ रोजी सकाळी ११ वा. पर्यटन व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून व्हर्च्युअल निषेध नोंदविला. पर्यटनातील १८ असोसिएशनचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.
सर्व सुरू झाले; पर्यटन मागे का?सर्व धार्मिक स्थळे सुरू झाली, चित्रपट गृहे, जीम, हाॅटेल, मॉल व जलतरण तलावही सुरू झाले. मग आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल पर्यटन व्यावसायिकांनी उठविला.
पत्रकारांच्या हस्ते चित्रफितीचे उद्घाटनकोरोनानंतर पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था सांगणाऱ्र्या पर्यटन व्यावसायिकांनी बनविलेल्या चित्रफितीचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रफीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच आता लवकरच अजित पवार व शरद पवार यांनाही साकडे घालण्यात येईल, असेही त्रस्त व्यावसायिकांनी सांगितले.