औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात गोरगरिबांची ही ‘लालपरी’ आता अधिक सुरक्षित प्रवास देणार आहे. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील शिवनेरी, शिवशाही, साधी बस अशा ३६५ बसगाड्यांना ‘अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत ५० गाड्यांचे कोटिंग झाले असून, आरोग्याच्या दृष्टीने हे तंत्र ‘सुरक्षा कवच’ ठरणार आहे.
एसटीमधून प्रवास करताना प्रवाशांचा अनावधानाने अनेक ठिकाणी स्पर्श होतो. त्यामुळे कोरोनासह इतर आजारांचा प्रसार होतो म्हणून अलिकडच्या काळात अनेकजण बसगाडीतून प्रवास करण्याचे टाळत आहेत. दरम्यान, कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजाराचा धोका टाळण्यासाठी एसटीने हे कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एजन्सी निवडीसाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. हे ‘अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ वैज्ञानिकदृष्ट्या विषाणू - जीवाणूंपासून संरक्षण देत असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगण्यात येते. बसमधील सीट, हँड रेस्ट, खिडक्या, चालकाची केबिन, दरवाजा, आपत्कालीन दरवाजा, सामान ठेवण्याची जागा आणि ज्या - ज्या ठिकाणी प्रवासादरम्यान स्पर्श होण्याची शक्यता असते, अशा सर्व ठिकाणी प्राधान्याने कोटिंग केले जात आहे. सध्या मध्यवर्ती बसस्थानकातील बसगाड्यांचे कोटिंगचे काम सुरू आहे. दोन दिवसांत सिडको बसस्थानकातील बसगाड्यांचेही कोटिंग केले जाणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
---
वर्षांतून ६ वेळा कोटिंग
अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग २ महिने टिकते. त्यानुसार वर्षभरात एका एसटी बसचे ६ वेळा कोटिंग केले जाणार आहे.
----
फोटो ओळ
औरंगाबादेतील एसटी बसगाड्यांना अशा प्रकारे ‘अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ केले जात आहे.