छत्रपती संभाजीनगर : ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. या समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शासनाने या वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरात दोन वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी २२ जून ते २५ जुलैदरम्यान, ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. या वसतिगृहात १०० मुलांना आणि १०० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक पी.बी. वाबळे यांनी कळविले आहे की, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये राहावे लागते. सरकारी सुविधा नसल्याने हे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून अनेकदा वंचित राहतात. विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संघटनांनी समाज कल्याण विभागाप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृहांसाठी आग्रह धरला होता. याची दखल घेत सन २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यांत मुला-मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातील भाड्याने इमारत घेऊन ही वसतिगृहे चालविली जाणार आहेत. त्यानुसार यंदा शहरात मुलींसाठी बालभारती परिसरात, रेल्वेस्टेशन रोड तर मुलांसाठी गरवारे स्टेडियमसमोर ही वसतिगृहे असणार आहेत. या वसतिगृहांत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी २२ जून ते २५ जुलैदरम्यान खोकडपुरा येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.
अर्जासोबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे बोनाफाइड सर्टिफिकेट, आधार कार्ड, बँक पासबुक, मागील वर्षाचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, रहिवासी प्रमाणपत्र आदींच्या छायांकित प्रती जोडाव्या लागणार आहेत. ही प्रवेशप्रक्रिया राबवताना इतर मागास प्रवर्गासाठी ४८ टक्के, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी २६ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ५ टक्के, अनुसूचित जातीसाठी ७ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ४ टक्के, दिव्यांगासाठी ५ टक्के, अनाथ मुलांसाठी २ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३ टक्के या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या वसतिगृहांसाठी राज्य सरकार पूर्णत: खर्च करणार असल्याचीही माहिती आहे.