औरंगाबाद : तुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. सगळे काही अनलॉक होत असताना आम्हाला विसरू नका. आता मनोरंजन क्षेत्रही अनलाॅक करा, असे आवाहन साऊंड असोसिएशन ऑफ औरंगाबादने शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाला केले.
आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते शॉर्टफिल्मचे अनावरण झाले. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष संदीप काळे, सचिव नंदु सोनवणे, उपाध्यक्ष अरुण कांबळे, समीर पाटील यांनी आ. दानवे यांना निवेदन दिले. मनोरंजन क्षेत्रावर अवलंबुन असलेल्या लोकांना कार्यक्रम बंद असल्याने उदरनिर्वाह भागविणे अवघड झाले आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी शुल्कात सुट, या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जफेडीसाठी मुदतवाढ, मनोरंजन क्षेत्रावर अवलंबुन असलेल्या गायक, वादक, साऊंड इंजिनिअर, नैपथ्य, एलईडी वाॅल, कलाकार, मेकअप आर्टीस्ट, कोरीओग्राफर, फोटो-व्हिडीओग्राफर, लाईट, जनरेटर यारख्या कामांवर जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक लोक आहेत. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जिल्ह्यातील वाघ्या-मुरळी, भारुड, जागरण गोंधळ, शाहिरी या कलाकारांप्रमाणे साऊंड असोसिएशननेही सहकार्याचा प्रकल्प दिला, तर त्यांनाही सहकार्य करु, शिवाय मुख्यमंत्री व सांस्कृतिक तसेच पर्यावरण मंत्र्यांना जिल्ह्यातील मनोरंजन क्षेत्राच्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आ. अंबादास दानवे यांनी दिले.