बाळासाहेब जाधव , लातूरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २०१२ च्या चालक भरतीतील घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने वरिष्ठ कार्यालयाने सर्व कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १५१ चालकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. एक महिन्यापासून ही पडताळणी शिक्षण मंडळाकडे प्रलंबित आहे. दरम्यान, आता पुढील भरती कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्ती देण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे.एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून २०१२ मध्ये १९७ चालक पदाच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली़ यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याने पात्र झालेल्या १२४ व इतर उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीचे प्रस्ताव तब्बल तीन वर्षानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीसाठी केवळ ८-१० दिवसांचा कालावधी लागत असतानाही एक महिन्यापासून पडताळणी प्रलंबित आहे.लातूर जिल्ह्यातील १ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १ असे २ उमेदवारांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी लाटली असल्याचे समोर आले आहे़ दुसऱ्या टप्प्यात १५ प्रस्ताव तर तिसऱ्या टप्प्यात २ असे एकूण १५२ उमेदवारांचे प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाकडे कागदपत्र तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु, महिनाभराचा कालावधी होऊनही कागदपत्रांची तपासणी झाली नाही. शिवाय, एसटी महामंडळानेही पडताळणीसाठी शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला नाही.
आता नेमणुका पडताळणी करूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 12:18 AM