औरंगाबाद : करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या जागेत अवघ्या पाच मोटार वाहन निरीक्षकांच्या खाद्यांवर वाहनांच्या फिटनेस तपासणीची धुरा आहे. त्यामुळे फिटनेससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर येते. फिटनेसची वेटिंग आठवडाभरापेक्षा कमी दिवसांवर आणण्यासाठी आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह विविध साहित्यांची मागणी केली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले, ७ मोटार वाहन निरीक्षक, ९ सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह कॅमेरे, संगणक, पोर्टेबल दिशादर्शक, डोंगल, डिस्प्ले टीव्ही, प्रथमोपचार पेट्या, टॅब, इंटरनेट लाईन, केबल कार, जनरेटर, सुरक्षारक्षक, ब्रेक टेस्ट मशीन, स्पीडगन, पीयूसी मशीन आदींची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ आणि हे सर्व साहित्य प्राप्त झाल्यानंतर कामकाज गतिमान होईल. त्यातून कमीत कमी दिवसांत फिटनेस तपासणी होणे शक्य होईल.