पैठण : येथील जायकवाडी धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून धरणात सध्या फक्त ७.२७ टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे यापुढे धरणाच्या मृतसाठ्यातून विविध योजनांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी बुधवारी फक्त ७.२८ टक्के पाणीसाठा राहिला आहे. येणाऱ्या काळात या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या योजनांना धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणाच्या ४९ वर्षात केवळ सहा वेळेसच धरण १०० टक्के भरले आहे तर ५० टक्क्यांच्या पुढे १३ वेळेस पाणी धरणात आले आहे. २०१८ मध्येही मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसून केवळ पिण्यासाठीच पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे, असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगर शहर, डीएमआयसी, एमआयडीसी पैठण, वाळूज, चितेगाव, शेंद्रा, बिडकीनसह विविध पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो. धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
यावर्षांमध्ये केला मृतसाठ्यातून पाणीपुरवठा१९७५-७६, ८०-८१, ८६-८७, ८७-८८, ९५-९६, २००१-२००२, २००२-२००३, २००४-२००५, २००९ -२०१०, २०१२-२०१३, २०१५-२०१६, २०१८-२०१९ असे ४९ वर्षात १२ वेळेस मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला आहे.